गेल्या तीन वर्षांपासून भारताच्या कसोटी संघातून खेळण्याची संधी फिरकी गोलंदाज अमित मिश्राला मिळालेली नाही. झिम्बाब्वे दौऱयामधील एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे अमित मिश्रासाठी भारतीय कसोटी संघाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. “माझा भारताच्या कसोटी संघात समावेश नाही. मी कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी भरपूर मेहनत करेन आणि त्यादृष्टीने पुढच्या दोन सामन्यातही उत्तम गोलंदाजीचा प्रयत्न करीन” असे अमित मिश्राने स्पष्ट केले आहे.
झिम्बाब्वे दौऱयात आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत मिश्राच्या खात्यात एकूण नऊ विकेट्स जमा आहेत. मिश्राने आतापर्यंत त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत एकदाच दहा विकेट्स पटाकाविल्या आहेत. सध्यासुरू असलेल्या झिम्बाब्वे मालिकेचे दोन सामने अजून शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करून मालिकेत पुन्हा एकदा दहा विकेट्स मिळविण्याच्या प्रयत्नात अमित मिश्रा असेल.