गेली दोन वर्षे भारतीय बॉक्सिंगला ऑलिम्पिक मान्यता मिळण्यासाठी आम्ही धडपडत होतो. आता भारताला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून तात्पुरती मान्यता मिळाल्याने आम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता मिळवण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. आम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे, असे मत बॉक्सिंग इंडिया या नव्या संघटनेचे महासचिव जय कवळी यांनी सांगितले.
‘‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन तसेच क्रीडा मंत्रालय यांची मान्यता मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर गेली दोन वर्षे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धापासून वंचित असलेले भारतीय बॉक्सर्स निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना नवी उमेद देण्यासाठी देशात बॉक्सिंगच्या स्पर्धा पुन्हा सुरू करणे, हे आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे. पुढील तीन महिन्यांत आमचे हेच प्रमुख लक्ष्य असणार आहे,’’ असेही जय कवळी यांनी सांगितले.
पुढील घडामोडींविषयी ते म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सिंगला नवी झळाळी देण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. सर्वाना एकत्र आणून आम्ही निवडणुका घेतल्या. दिल्ली, हरयाणातील प्रस्थापितांविरुद्ध आम्ही लढलो. माझ्यावर आरोप-प्रत्यारोपही झाले. पण सर्वानी साथ दिल्यामुळे मी निवडून आलो. आता या विजयाने हुरळून न जाता जबाबदारीने काम करावे लागणार आहे. गुरुवारी आम्ही क्रीडा मंत्रालयाचे सचिव अजित शरन यांची भेट घेऊन मान्यता मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन आम्ही त्यांच्याशी मान्यता मिळवण्याविषयी चर्चा केली आहे.’’
आशियाई स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सच्या कामगिरीविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘गेली दोन वर्षे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर लढण्याची मोजकीच संधी मिळाल्यामुळे आम्ही या बॉक्सर्सकडून कोणतीही अपेक्षा बाळगली नाही. सर्वोत्तम खेळ करून या, असाच सल्ला आम्ही त्यांना दिला आहे. तरीही भारतीय संघात अव्वल आणि गुणी बॉक्सर्स आहेत. त्यांनी पदक मिळवले तर भारतासाठी ती सोन्याहून पिवळी कामगिरी ठरणार आहे.’’