टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा एक महान खेळाडू आहे, असे क्रिकेटचे जाणकार म्हणतात. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीकडे पाहता त्याचा प्रत्यय येतो. केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स अशा महान खेळाडूंच्या पंगतीत विराट देखील आहे. याच यादीत गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याचीही गणती होऊ लागली आहे. मात्र विराटशी माझी तुलना नको असे सांगत जे विराटने भारतासाठी केलं आहे, तर मला पाकिस्तानसाठी करायचं आहे, असे मत बाबर आझमने व्यक्त केले आहे.

कोहलीशी तुलना म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. तो अत्यंत सातत्यपूर्ण खेळ करतो. त्याचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे.फलंदाजीला तो जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो, त्या त्या वेळी तो आपली १०० टक्के मेहनत घेतो आणि सर्वस्व झोकून देतो. माझ्या कारकिर्दीची आता केवळ सुरुवात आहे. मला आता खूप परिश्रम घ्य्याची आहे आणि पाकिस्तानसाठी मोठे योगदान द्यायचे आहे, असे तो म्हणाला.

मी अगदी तरुण वयात क्रिकेटकडे आकर्षित झालो. माझे काका अक्रम सिद्दीक यांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर मी क्रिकेटमध्ये आलो. मी अजूनही क्रिकेट शिकत आहे. मी माझ्या चुकांमधून आणि वरिष्ठांकडून धडे घेत आहे. कारण मला कसोटी क्रिकेटसह सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये उत्तम खेळ करून दाखवायचा आहे, असे त्याने सांगितले.