जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्याचा आनंद आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंत स्पर्धा तीव्र असल्याने अव्वल स्थान टिकवणे अवघड असल्याचे बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले. अव्वल स्थानी कायम राहण्यासंदर्भात आशावादी असून, त्यासाठी अधिक मेहनत करणार असल्याचे सायनाने सांगितले.
‘सर्व काही मनाप्रमाणे घडले, मी जीव तोडून सराव केला तर क्रमवारीतील अव्वल स्थानी कायम राहू शकते. पण हे सोपे नाही. मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. क्रमवारीत अव्वल स्थानी आहे याची मला स्वत:ला सातत्याने जाणीव करून द्यावी लागणार आहे आणि सराव करतानाही हे लक्षात ठेवावे लागणार आहे. देशासाठी जास्तीत जास्त पदके, जेतेपदे जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे’, असे सायनाने सांगितले.  
अव्वल स्थानासाठी कोणती खेळाडू तुल्यबळ टक्कर देऊ शकते याविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘ली झेरुई ही प्रबळ दावेदार आहे. तिने मला असंख्य वेळा नमवले आहे. मी अव्वल स्थान ग्रहण करण्यापूर्वी ली हीच प्रदीर्घ काळ अव्वल स्थानी होती.  अव्वल पाचमध्ये असणारे सर्वच खेळाडू अव्वल स्थान पटकावण्यासाठी आतूर असतात.’