वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद ९४ धावांच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला. लोकेश राहुलनेही या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामना संपल्यानंतर सर्वांनी लोकेश राहुलचं कौतुक केलं. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून लोकेश राहुलचं फॉर्मात येणं हे भारतीय संघासाठी फायदेशीर मानलं जात आहे. मात्र स्वतः लोकेश राहुल सध्या विश्वचषक संघातील स्थानाबद्दल विचार करत नाहीये, त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे.

“अगदी खरं सांगायचं झालं तर विश्वचषक अद्याप लांब आहे. मला सलामीला येऊन फलंदाजी करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. विश्वचषकातील स्थानाबद्दलचा विचार न करता मला चांगला खेळ करत रहायचं आहे. त्याआधी संघाला बरेच सामने खेळायचे आहेत.” पहिल्या सामन्यानंतर राहुल बोलत होता. राहुलने पहिल्या सामन्यात ४० चेंडूत ६२ धावा केल्या. शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यामुळे लोकेश राहुलला सलामीला येण्याची संधी मिळाली आहे.

या मालिकेत भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना रविवारी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ बाजी मारुन मालिकेत विजयी आघाडी घेतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य पाहा – टीम इंडियाची विक्रमी यशोगाथा, पाहा एकाच क्लिकवर