२०१७ हे वर्ष भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी चांगलं गेलेलं आहे. किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, साई प्रणीत, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या खेळाडूंनी सुपरसिरीज स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत, जागतिक क्रमवारीत अव्वल १० जणांच्या यादीत प्रवेश केला. मात्र नवीन वर्षात भारताची रिओ ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान गाठण्याचं ध्येय ठेवलं आहे. हे ध्येय गाठल्याशिवाय मला नीट झोपही येणार नाही, असंही सिंधू म्हणाली.

अवश्य वाचा – दुहेरीतील खेळाडूंना सापत्न वागणूक

२०१७ या वर्षाच्या अखेरीस दोन महिने सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं होतं. सिंधूच्या कारकिर्दीतलं हे सर्वोत्तम स्थान ठरलं होतं. “आगामी वर्षांत मी जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावण्याचं ध्येय ठेवलं आहे. सध्या मी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आगामी वर्षात मी किती स्पर्धांमध्ये सहभागी होते यावर माझं पहिलं स्थान अवलंबून असेल. त्यामुळे रँकिंगचा विचार मनात न ठेवता मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करणार आहे. जर मी चांगला खेळ केला तर आपोआप मला पहिला क्रमांक मिळणारचं आहे.” नवी दिल्लीत प्रिमीअर बॅडमिंटन लीगचा सामना झाल्यानंतर सिंधू पत्रकारांशी बोलत होती.

अवश्य वाचा – सर्व्हिसच्या नियमबदलांची वेळ चुकीची – सिंधू

२०१७ सालात पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी, इंडिया ओपन, कोरिया ओपन या स्पर्धेची विजेतेपद पटकावली. याव्यतिरीक्त विश्व अजिंक्यपद स्पर्धा, हाँगकाँग ओपन आणि दुबई ओपन सुपरसिरीज स्पर्धेचं उप-विजेतेपद पटकावलं. या सर्व सामन्यांमध्ये जपानच्या नोझुमी ओकुहाराविरुद्ध झालेला सामना आपल्यासाठी सर्वात कठीण सामना असल्याचंही सिंधू म्हणाली. यावेळी सिंधूने भारतीय पाठीराख्यांकडून मिळणाऱ्या पाठींब्याबद्दलही आभार व्यक्त केले. भारतात आता अनेक लोकं बॅडमिंटनचे सामने पहायला येतात. दुबई ओपन स्पर्धेतली अनेक स्थानिक लोकांसह भारतीय लोकांनी मला पाठींबा दिला. एक खेळाडू म्हणून सामना जिंकण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होत असल्याचंही सिंधूने मान्य केलं.

अवश्य वाचा – नवीन वर्षात भारतीय बॅडमिंटनपटूंना परदेशी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन नाही?