काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव जयपूर शहरात पार पडला. अनेक नवोदीत खेळाडूंना या लिलावात कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या. अनेक परदेशी खेळाडूंनीही या लिलावात भरघोस रक्कम कमावली आहे. मात्र या सर्वांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर घालण्यात आलेली बंदी, आता पाक क्रिकेट बोर्डाला प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवीन महाव्यवस्थापक वासिम खान यांनी, पाक खेळाडूंना पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना पहायला आम्हाला आवडेल असं सूचक वक्तव्य केलं आहे.
“मला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बसून या विषयावर तोडगा काढायला नक्की आवडेल. जोपर्यंत मुद्दा क्रिकेटशी संबंधीत आहे, त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. मात्र जर मुद्दा क्रिकेटच्या पलीकडे गेला तर प्रत्येकाला विचारामध्ये बदल करण्याची गरज आहे. पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मला आवडेल.” वासिम खान आयसीसीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
2008 साली झालेल्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे काही खेळाडू सहभागी झाले होते. मात्र 26/11 च्या हल्ल्यानंतर भारतीय सरकार आणि बीसीसीआय यांनी पाकिस्तान संघाशी क्रिकेट खेळण्यास स्पष्ट नकार दिला. याचसोबत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही असंही बीसीसीआयने जाहीर केलं. त्या वर्षापासून आतापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत नाहीयेत. पहिल्या सत्रात शोएब अख्तर, शोएब मलिक, शाहीद आफ्रिदी, युनुस खान, मोहम्मद असिफ, कामरान अकमल, उमर गुल, सोहील तन्वीर, मोहम्मद हाफीज, सलमान बट, मिसबाह उल-हक हे पाकिस्तानी खेळाडू सहभागी झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 1:38 pm