जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला नमवणे आव्हानात्मक ठरेल, असा इशारा माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिला आहे.

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू फ्लॉवर हे २०१२मध्ये भारतात मालिका विजय मिळवणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे प्रशिक्षक होते. ५२ वर्षीय फ्लॉवर यांनी आगामी मालिकेबाबत म्हटले की, ‘‘ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत २-१ असा संस्मरणीय विजय मिळवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. याचप्रमाणे जागतिक क्रिकेटमध्येही त्यांनी आपले स्थान अधोरेखित केले आहे. २०१२च्या भारत दौऱ्यावर जे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने केले, तेच रूटने करण्याची आवश्यकता आहे.’’

‘‘भारतामधील चार कसोटी सामन्यांची मालिका वेगळ्या अर्थाने आव्हानात्मक आहे. २०१२पेक्षा आताचा भारतीय संघ अधिक बलाढय़ आहे. ऑस्ट्रेलियामधील विजयानंतर समीकरणे बदलली आहेत. रूटने कुकप्रमाणे मोठय़ा खेळी साकारून फलंदाजीचा भार स्वीकारावा,’’ असे फ्लॉवर यांनी सांगितले.

‘‘भारताने ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिका, मेलबर्न आणि ब्रिस्बेन कसोटी सामन्यांसह मालिका इतके नव्हे, तर दोन वर्षांपूर्वीची ऑस्ट्रेलियातील मालिकाही जिंकून दाखवली आहे. त्यामुळे रूटसह जोस बटलर आणि बेन स्टोक्स या खेळाडूंनी दडपण झुगारत फिरकी गोलंदाजीचा दिमाखात सामना करायची आवश्यकता आहे,’’ असे फ्लॉवर यांनी सांगितले.

मालिकेसाठी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ा -बर्न्‍स

चेन्नई : जागतिक दर्जाच्या जसप्रित बुमरासह भारताचा वेगवान गोलंदाजीचा मारा दर्जेदार आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ा असतील, अशी आशा इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्‍सने व्यक्त केली. त्यामुळे डॉम बेस आणि जॅक लीच या फिरकी गोलंदाजांवर फारसे दडपण येणार नाही, असे ३० वर्षीय बर्न्‍सने सांगितले. पितृत्वाच्या रजेमुळे बर्न्‍सने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावरून माघार घेतली होती.

इंग्लंड दौऱ्यावर भारताचा भारत ‘अ’ संघाशी सराव सामना

लंडन : वर्षांच्या उत्तरार्धात भारत आणि भारतीय ‘अ’ संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून, याआधी नॉर्दम्पटनशायर येथील कौंटी ग्राउंडवर हा सराव सामना होणार आहे. यानंतर लिस्टरशायर येथे २८ जुलैपासून भारतीय संघ दुसरा सराव सामना खेळणार आह. त्यानंतर ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे.