दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चमकदार कामगिरी करणारा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आयसीसी कसोटी क्रमवारीत सोमवारी पाचव्या स्थानावर झेप घेतली. २०११मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर मी गेल्या सहा महिन्यांपासून तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेत आहे. त्याचेच फळ मला मिळाले आहे, असे सांगत पुजाराने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुजाराने २८० धावा फटकावल्या. तो म्हणाला, ‘‘गेल्या दीड वर्षांत माझी कामगिरी समाधानकारक होत आहे. मी माझ्या खेळावर तसेच तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेतोय. तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याचे ठरवल्यामुळेच माझी कामगिरी बहरत आहे. सुरुवातीला जिममध्ये जाण्यासाठी मी टाळाटाळ करायचो. पण तंदुरुस्तीचे महत्त्व पटल्यानंतर मी आळस झटकून टाकला आहे.’’
इंडियन ऑइलच्या सेवेत असणाऱ्या खेळाडूंचा सोमवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी पुजारा म्हणाला, ‘‘तंदुरुस्तीत सुधारणा झाल्याने मला फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करता आले. एक क्रिकेटपटू या नात्याने मला अधिक परिपक्व व्हायचे आहे.’’ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत ०-२, तर कसोटी मालिकेत ०-१ असा पराभव पत्करावा लागला. मात्र या दौऱ्याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देणे त्याने टाळले. ‘‘घडून गेलेल्या किंवा आगामी दौऱ्यांविषयी माहिती देण्यास भारतीय क्रिकेटपटूंवर बीसीसीआयने बंदी आणली आहे. त्यामुळे मी कोणत्याही मालिकेविषयी काहीही बोलणार नाही,’’ असे त्याने सांगितले.
आपल्या गतआठवणींना उजाळा देत पुजारा म्हणाला, ‘‘१९ वर्षांचा असताना मी क्रिकेटपटू म्हणून इंडियन ऑइलच्या सेवेत रुजू झालो. त्यावेळी अनेक स्थानिक आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये मी खेळलो. त्यावेळी वसिम जाफर आणि अन्य खेळाडूंची मला भरपूर मदत मिळाली. त्यांचा मी कायम ऋणी राहीन.’’ या कार्यक्रमाला मुंबईचा रणजी कर्णधार वसिम जाफर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, स्नूकरपटू आदित्य मेहता, बॅडमिंटनपटू पी. कश्यप, अपर्णा बालन तसेच धावपटू अमिया मलिक आणि कॅरमपटू योगेश परदेशी व के. श्रीनिवास उपस्थित होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाबाद ५१ आणि ९६ धावांची खेळी करणाऱ्या रहाणेनेही या दौऱ्याविषयी बोलणे टाळले. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करताना मानसिक कणखरता सर्वात महत्त्वाची असते. सध्या त्यावरच मी मेहनत घेत आहे,’’ असे रहाणेने सांगितले.

आयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा पाचव्या स्थानी
दुबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा झाली असून, त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. विराट कोहली मात्र ११व्या स्थानी घसरला आहे. पुजाराने ८५१ गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांमध्ये आर. अश्विन सातव्या स्थानी आहे. डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा नवव्या क्रमांकावर आहे.