भारतीय संघाला २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्या स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी केली होती. विराटच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकला ७६ धावांनी मात दिली होती. याच सामन्यातील एक भन्नाट किस्सा सुरेश रैनाने सांगितला.

सुरेश रैनाने नुकतीच यु ट्यूबवरून मुलाखत दिली. त्यात त्याने धोनीबद्दलचा किस्सा सांगितला. “सहसा अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळायचा आणि मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जायचो. पण त्या दिवशी काय घडलं ते समजलं नाही. विराट झकास फलंदाजी करत होता. धवनदेखील त्याला चांगली साथ देत होता. मी तर छान सँडविच खात बसलो होतो, तितक्यात धोनी आला आणि मला फलंदाजीसाठी पॅड-अप करायला सांगितलं”, असं त्याने सांगितलं.

पुढे रैना म्हणाला, “मी धोनीच्या निर्णयावर कधीच प्रश्न विचारले नाही. सँडविच खात असताना मला असं सांगितल्यावर मी हातातलं सँडविच बाजूला ठेवून पॅड-अप करायला उठलो. आणि काही वेळातच धवन धावबाद झाला. त्यामुळे सँडविच तसंच बाजूला ठेवून मी थेट मैदानात फलंदाजीला गेलो आणि चांगल्या ७०-८० धावा चोपल्या.”

रैना मैदानात गेला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद १६२ होती. रैना आणि कोहलीने मिळून ११० धावांची भागीदारी केली. रैनाने त्या सामन्यात ५६ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराट कोहलीने १०७ धावांची दमदार खेळी केली होती. रैनानेदेखील दमदार खेळी केली होती, पण विराटच्या शतकापुढे रैनाची खेळी झाकली गेली. भारताने तो सामना अतिशय सहज जिंकला.