निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकाराच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या हातातून विजय खेचून आणला आणि मालिका जिंकली. शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार लगावल्याने भारताने चार गडी राखत बांगलादेशचा पराभव केला. मैदानात तुफान फटकेबाजी करत विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या दिनेश कार्तिकेने आपण गेल्या अनेक दिवसांपासून असे शॉट्स खेळण्याचा सराव करत होतो असं सांगितलं आहे.

दिनेश कार्तिक मैदानात उतरला तेव्हा १३३ धावांवर पाच विकेट्स अशी भारताची परिस्थिती होती. कार्तिकने मैदानात उतरताच दोन षटकार आणि एका चौकार ठोकत विजय जवळ आणला. पण अखेरच्या ओव्हरमध्ये खरा सामना रंगला. अखेरच्या ओव्हरमधील अखेरचा चेंडू आणि समोर होता दिनेश कार्तिक. भारतीय चाहते किमान चौकार तरी जावा यासाठी प्रार्थना करत होते. पण दिनेश कार्तिकने अनपेक्षितपणे षटकार लगावला आणि मैदानात चाहत्यांचा जल्लोष सुरु झाला.

सामन्यानंतर बोलताना दिनेश कार्तिकने सांगितलं की, ‘मी असे फटके मारण्याचा सराव करत होतेो. मजबूत बेस तयार करायचा आणि मग फकटेबाजी करायची’. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, ‘मी जिथे आज आहे त्याचा मला प्रचंड आनंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून मला नेहमी पाठिंबा देणा-या सपोर्ट स्टाफचेही मला आभार मानायचे आहेत’.

१६७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ५६ धावांची कर्णधार खेळी केली. यानंतर आलेल्या मनिष पांडेने २८ धावांची संयमी खेळी केली, पण संघाला गरज असताना त्याने विकेट गमावली. शेवटी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने संघाला विजय मिळवून दिला.

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकीब अल हसन याने सामन्यानंतर बोलताना प्रतिक्रिया दिली की, ‘दुख: होतं, पण अशा सामन्यांमधून खूप काही शिकायला मिळतं. सर्व श्रेय दिनेश कार्तिकचं आहे. या खेळातून आम्ही खूप काही सकारात्मक गोष्टी घेऊ शकतो’.