ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी काहीशी डगमगली. शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दमदार खेळी करत विक्रम रचला.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने झुंज दिली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. खालच्या फळीतील फलंदाजांप्रमाणे बॅट फिरवण्यात धन्यता न मानता त्यांनी तंत्रशुद्ध खेळ केला. दोघांनीबी आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावले. शार्दुल ठाकूरने षटकार लगावत ९१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, तर वॉशिंग्टन सुंदरने त्यानंतरच्या षटकात अर्धशतक झळकावलं. या दोघांनी शतकी भागीदारीदेखील केली. ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी ही भारताची सर्वात मोठी भागीदारी ठरली.

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे चहापानानंतरचा खेळ रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी खेळ नियमित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या दोन बाद ६२ असून पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. शुबमन गिल अवघ्या सात धावा काढून माघारी गेला. रोहितने ४४ धावांची खेळी केली, पण तो देखील खराब फटका खेळत बाद झाला.