ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी काहीशी डगमगली. शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरला. यात वॉशिंग्टन सुंदरने मिचेल स्टार्कला मारलेला चौकार चांगलाच चर्चेत आला.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने झुंज दिली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. त्यात वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. खालच्या फळीतील फलंदाज बॅट फिरवतात आणि चुकून चौकार षटकार जातात हे तर नेहमीच पाहिलं जातं. पण वॉशिंग्टन सुंदरने एखाद्या अनुभवी फलंदाजाप्रमाणे स्टार्कला फटका मारला. गुड लेंग्थ चेंडूवर त्याने स्ट्रेट ड्राईव्ह मारत साऱ्यांनाच अवाक केले.

पाहा त्याने मारलेला चौकार-

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे चहापानानंतरचा खेळ रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी खेळ नियमित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या दोन बाद ६२ असून पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. शुबमन गिल अवघ्या सात धावा काढून माघारी गेला. रोहितने ४४ धावांची खेळी केली, पण तो देखील खराब फटका खेळत बाद झाला.