टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. हा संघ तेथे सुमारे ४ महिने असेल. विराटसेनेला प्रथम जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळावे लागणार आहे. त्यानंतर यजमान देश इंग्लंडविरुद्ध त्यांना पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना इशारा दिला आहे, की जर एखादा खेळाडू दौर्‍यापूर्वी करोना पॉझिटिव्ह आला तर तो दौर्‍यावर जाणार नाही.

वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांचा त्याग

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे होणार आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर यांनी आपल्या मुलाला व्हायरसपासून वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्याचे वडील आयकर विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात. नोकरीनिमित्त त्याला आठवड्यातून तीन वेळा ऑफिसला जावे लागते. चेन्नईत करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी घरी न राहण्याचे ठरविले आहे. त्याऐवजी, ते दुसर्‍या घरात राहत असून कुटुंबासह ते ऑनलाइन कनेक्ट आहे.

एम. सुंदर म्हणाले, ”जेव्हापासून वॉशिंग्टन आयपीएलमधून घरी परतला, मी दुसर्‍या घरात राहत आहे. माझी पत्नी व मुलगी नुकतीच वॉशिंग्टनसोबत राहत आहेत कारण ते घराबाहेर जात नाहीत. मी त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो. मला आठवड्यातून काही दिवस ऑफिसला जावे लागते. माझ्यामुळे घरात करोना यावा अशी माझी इच्छा नाही.”

”इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याची इच्छा”

वॉशिंग्टनच्या वडिलांनी सांगितले, ”वॉशिंग्टनला नेहमी इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याची इच्छा होती. हा दौरा त्याच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला नेहमी लॉर्ड्स व इंग्लंडच्या अन्य मैदानावर खेळायचे होते. हे त्याचे अनेक वर्षांचे स्वप्न आहे. हा दौरा कोणत्याही किंमतीत रद्द व्हावा अशी त्याची इच्छा नाही. २०१८मध्येही वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंड दौर्‍यावर वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले होते, पण दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही.

भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ एकाच चार्टर्ड विमानाने इंग्लंडला एकत्र प्रवास करतील. महिला संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. दोन्ही संघ २ जूनला रवाना होतील.