भारतीय संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील पराभवापासून अखेर वरुणराजाने वाचवले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेवर निभ्रेळ वर्चस्व प्रस्थापित करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आटोपल्यावर मुसळधार सरी सुरू झाल्या आणि सामन्यावरील पावसाचा अंदाज खरा ठरवला. त्यामुळे शेवटी हा सामना रद्द करण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेवर २-० असा कब्जा केला.
त्याआधी, दक्षिण आफ्रिका संघाला प्रारंभीच हादरे बसल्यामुळे त्यांची ३ बाद २८ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. परंतु क्विंटन डी कॉक आणि ए बी डी व्हिलियर्स यांनी शानदार शतके झळकावून दक्षिण आफ्रिकेला ८ बाद ३०१ अशी दिमाखदार धावसंख्या उभारून दिली. कॉकने भारताविरुद्धच्या सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याची किमया साधली.
डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि जॅक कॅलिस या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थित दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात उतरला. डी व्हिलियर्सने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून गोलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या फळीला हादरविले. परंतु डी कॉकने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर संघाचा डाव सावरला. डी कॉक आणि डी व्हिलियर्स यांनी चौथ्या विकेटसाठी १७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. डी कॉकने आपल्या कारकिर्दीतील चौथे शतक साकारले. त्याने १२० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह आपली १०१ धावांची खेळी साकारली, तर डी व्हिलियर्सने १०१ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह आपले सोळावे एकदिवसीय शतक (१०९) साजरे केले. उत्तरार्धात शमी आणि इशांतने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर पुन्हा अंकुश ठेवला. परंतु डेव्हिड मिलरने एक बाजू सावरत ३४ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. भारताकडून इशांतने ४० धावांत ४ बळी घेताना एकदिवसीय क्रिकेटमधील १०० बळींचा टप्पा ओलांडला, तर शमीने ६९ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ८ बाद ३०१ (क्विंटन डी कॉक १०१, ए बी डी व्हिलियर्स १०९, डेव्हिड मिलर नाबाद ५६; इशांत शर्मा ४/४०, मोहम्मद शमी ३/६९)