७ फेब्रुवारी १९९९ हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी अनोखा पराक्रम केला. कुंबळेने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीमध्ये एकाच डावात गडी बाद करण्याची किमया केली. एकाच डावात दहा बळी टिपणारा कुंबळे दुसरा गोलंदाज ठरला होता. याआधी हा पराक्रम इंग्लंडच्या जिम लाकेर यांच्या नावावर होता.

भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ४२० धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. त्यामुळे सामना अनिर्णित ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू होता. अखेरच्या दिवशी पाकचे फलंदाज खेळपट्टीवर सावधपणे फलंदाजी करून सामना अनिर्णित राहील, याची काळजी घेत होते. पण अनिल कुंबळने पाकच्या फलंदाजांना आपल्या फिरकी जाळ्यात ओढून ७४ धावांमध्ये १० विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने शतकी सलामी दिली होती. पण त्यानंतर कुंबळने आपली जादू दाखवण्यास सुरूवात केली. १९८ धावांत पाकिस्तानचे ९ गडी बाद झाले होते. वसिम अक्रम आणि वकार युनिस ही शेवटची जोडी मैदानात होती. त्या क्षणाबद्दल नुकतेच एका मुलाखतीत अक्रमने सांगितलं. ‘त्यावेळी दुसऱ्या खेळाडूच्या गोलंदाजीवर मुद्दाम बाद होण्याचा विचार आला होता का?’ असा प्रश्न समालोचक आकाश चोप्रा याने यू-ट्यूब लाइव्ह चॅटमध्ये वसीम अक्रमला विचारला.

या प्रश्नाचे उत्तर देताना अक्रमने एक खास गोष्ट सांगितली. मी आणि वकारने खिलाडूवृत्ती सोडली असती तर कुंबळेला दहावी विकेट मिळाली नसती, असे तो म्हणाला. “जर आम्ही मुद्दाम दुसऱ्या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झालो असतो तर ते खिलाडूवृत्तीला धरून नव्हते. त्यामुळे मी वकारला सांगितलं की तू नेहमीसारखं क्रिकेट खेळ. कर्णधार म्हणून ते सांगणं माझं कर्तव्य होतं. मी वकारला म्हटलं की तू जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीवर फटकेबाजी कर. मी कुंबळेची गोलंदाजी खेळून काढतो. काहीही झालं तरी कुंबळेच्या गोलंदाजीवर बाद न होण्याचा माझा प्रयत्न होता. पण कुंबळे नवीन षटक घेऊन आला. त्याने टाकलेला चेंडू माझ्या बॅटला लागला आणि मी झेलबाद झालो. तो दिवस कुंबळे आणि भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा होता”, असे अक्रमने सांगितलं.