भारत विरूद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना कायमच दोन्ही संघातील खेळाडूंसाठी दडपणाचा असतो. तुम्ही एकवेळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकू नका, पण पाकिस्तानशी जिंकलंच पाहिजे, अशी भावना अनेक भारतीयांच्या मनात टीम इंडिया खेळत असताना असते. त्यामुळे या दोन संघांच्या खेळाडूंना एकमेकांच्या संघाविरूद्ध चांगली कामगिरी करणं भागच असतं, अन्यथा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेला त्या खेळाडूला सामोरे जावे लागते. असे असूनही पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात आठवणीत राहणारा दौरा कोणता? या प्रश्नाचं उत्तर देताना भारतातील १९९९ च्या दौऱ्याचे नाव घेतले.

“९० च्या शतकातील गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही भारताविरूद्ध अनेक सामने जिंकायचो. सध्याची गोष्ट थो़डी वेगळी आहे, पण त्यावेळी आम्ही दमदार कामगिरी करायचो. १९९९ चा भारत दौरा हा माझ्यासाठी विस्मरणीय आहे. जवळपास १० वर्षांनी आम्ही भारताचा दौरा केला. त्यावेळी चेन्नईसला पहिला सामना झाला. त्या सामन्यात साकलेन मुश्ताकने उत्तम गोलंदाजी केली आणि स्टेडियममधील चाहत्यांनी आम्हाला उभे राहून मानवंदना दिली. तो क्षण खूपच चांगला होता. त्यानंतर दुसरा सामना दिल्लीत झाला आणि त्यात अनिल कुंबळेने एकाच डावात १० बळी टिपले. त्यामुळे तो दौरा सकारात्मक पद्धतीने माझ्या नेहमीच स्मरणात राहिला”, असे अक्रमने शेन वॉटसनशी Lessons Learnt with the Greats पॉडकास्टमध्ये सांगितले.

…तर कुंबळेला दहावी विकेट मिळाली नसती – वसीम अक्रम

“जर आम्ही मुद्दाम दुसऱ्या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झालो असतो तर ते खिलाडूवृत्तीला धरून नव्हते. त्यामुळे मी वकारला सांगितलं की तू नेहमीसारखं क्रिकेट खेळ. कर्णधार म्हणून ते सांगणं माझं कर्तव्य होतं. मी वकारला म्हटलं की तू जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीवर फटकेबाजी कर. मी कुंबळेची गोलंदाजी खेळून काढतो. काहीही झालं तरी कुंबळेच्या गोलंदाजीवर बाद न होण्याचा माझा प्रयत्न होता. पण कुंबळे नवीन षटक घेऊन आला. त्याने टाकलेला चेंडू माझ्या बॅटला लागला आणि मी झेलबाद झालो. तो दिवस कुंबळे आणि भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा होता”, असे अक्रमने सांगितलं.