पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजनंतर करोना काळात इंग्लंडचा दौरा करणारा पाकिस्तान दुसरा संघ आहे. कडक नियमांतर्गत पाकिस्तानी खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवले गेले आहे. कोविड-१९ चाचणी केल्याशिवाय खेळाडूंना जैव-सुरक्षित ‘बबल’मध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. संपूर्ण दौऱ्यासाठी त्यांना स्वत:ला बाहेरील जगापासून दूर करावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानचे इंग्लंड दौर्‍याबद्दल आभार मानले. दोन्ही संघांच्या दौऱ्यांमुळे ECBला आर्थिक तोटा टाळता आला. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम याने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

“तुम्ही पाकिस्तान क्रिकेट आणि देशाचे खूप ऋणी आहात असं तुम्ही म्हणता तर माझी एक विनंती आहे. आमचे खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात जवळजवळ अडीच महिने आहेत. त्यामुळे जर सारं काही सुरळीत झालं, तर इंग्लंडने पाकिस्तान दौर्‍यावर यायला हवं. मी तुम्हाला वचन देतो की पाकिस्तानच्या मैदानावर आणि बाहेरही संघाला योग्यप्रकारे सुरक्षा पुरवली जाईल. आमच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये अ‍ॅलेक्स हेल्स आणि ख्रिस जॉर्डन हे इंग्लंडचे खेळाडू खेळले आहेत. त्यांना योग्यप्रकारे सुरक्षा दिली गेली. त्यांनी खेळाचा आनंद लुटला. त्यामुळे प्रत्येक सामन्यात स्टेडियम्स भरलेली दिसतील”, असे अक्रम म्हणाले.

२००९ मध्ये लाहोर शहरात श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यापासून आघाडीच्या संघांनी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला. इंग्लंडने अखेरचा पाकिस्तान दौरा २००५-०६ दरम्यान केला होता, पण पाकिस्तानच्या PSLमध्ये इंग्लिश खेळाडूंचा सहभाग होता. त्याच मुद्द्याचा आधार घेत इंग्लंडने २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा करणे अपेक्षित आहे असे अक्रम म्हणाला.