भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानला काही माजी खेळाडू अप्रत्यक्षपणे निवृत्ती घेण्याचा सल्ला देत असले तरी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम आणि भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमोन्स यांना मात्र झहीरची संघात मोलाची भूमिका असल्याचे वाटते.
‘‘९० कसोटी सामने खेळल्यावर पुनरागमन करणे कठीण असते, फक्त गोलंदाजीसाठी नाही तर तुम्ही कमावलेल्या नावासाठी,’’ असे अक्रमने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. तो पुढे म्हणाला की, ‘‘झहीरकडे अजूनही देशाची सेवा करण्याची बरीच संधी आहे, इम्रान खान मला आणि वकार युनूसला ‘मिड ऑन’ किंवा ‘मिड ऑफ’ला उभा करायचा आणि आम्हाला त्या वेळी गोलंदाजाकडून बरेच काही शिकायला मिळाले, तसेच झहीरने संघातील युवा गोलंदाजांबरोबर करायला हवे. त्याने युवा गोलंदाजांना शिकवायला हवे, यामध्ये काही गोष्टी त्याच्याही हाती लागतील. निवृत्त होण्यापूर्वी झहीरने २-३ वेगवान गोलंदाज तयार करायला हवेत. झहीरमध्ये हे करण्याची क्षमता असून त्याची ही भूमिका संघासाठी नक्की फार मोलाची ठरेल.’’
झहीरबाबत भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स म्हणाले की, ‘‘झहीरकडे वेगाबरोबर गुणवत्ता आहेच, पण त्याचबरोबर त्याच्याकडे चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कलाही आहे, झहीर चेंडू दोन्ही बाजूंना अप्रतिमपणे ‘स्विंग’ करू शकतो आणि या साऱ्या गोष्टींमुळेच तो यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे.’’
ते पुढे म्हणाले की, ‘‘गोलंदाजीमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे असते. जर संघातील ३-४ गोलंदाज जवळपास सारख्या वेगाने गोलंदाजी करीत असतील, तर त्याचा परिणाम जास्त होणार नाही. पण झहीरसारखा एखादा वेगवान गोलंदाज असेल तर अन्य गोलंदाजांनाही त्याचा फायदा होईल. सर रिचर्ड हॅडली यांनीही असेच केले होते आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले होते.’’