विदर्भाच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेत बलाढ्य दिल्लीच्या संघावर मात करत पहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयात विदर्भाच्या अनुभवी आणि तरुण खेळाडूंनी मोलाचं योगदान बजावलं. यात मुळचा मुंबईकर मात्र सध्या विदर्भाच्या संघाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरनेही महत्वाची कामगिरी बजावली होती. मात्र यंदाचा रणजी हंगाम वासिम जाफरने, आपल्या मानधनातल्या रकमेतील एकही पैसा न स्विकारता खेळला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वासिम जाफरने ही गोष्ट मान्य केली.

अवश्य वाचा – विदर्भातील क्रिकेट संस्कृतीवर जेतेपदाचा सकारात्मक परिणाम

“२०१६-१७ या हंगामाकरता विदर्भ क्रिकेट असोसिएशनने माझ्यासोबत करार केला होता. यादरम्यान ऑक्टोबर, जानेवारी आणि मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये मला मानधनाची रक्कम मिळेल, असं स्पष्ट लिहीलं होतं. या हंगामात मी रणजी करंडक खेळावा अशी असोसिएशनची मागणी होती. मात्र दुखापतीमुळे मला ते शक्य झालं नाही. मात्र असं असतानाही विदर्भ क्रिकेट असोसिएशनने मला माझ्या मानधनाची रक्कम वेळच्या वेळी देऊ केली.” हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत वासिम जाफर बोलत होता.

अवश्य वाचा – प्रकृती साथ देईल, तोवर खेळणार!

“ऑक्टोबरच्या काळात दुखापतीमुळे मी खेळू शकलो नाही, ज्यासाठी मला पैसे मिळाले नाहीत. ही गोष्ट मी मान्य केली, पण जानेवारीच्या दरम्यान मी पुर्णपणे तंदुरुस्त असुनही माझी संघात निवड झाली नाही. पण अशा परिस्थितीतही माझ्यासोबत झालेल्या कराराचा आदर करुन असोसिएशनने मला माझ्या करारात लिहून दिलेली पूर्ण रक्कम दिली. पण एक खेळाडू म्हणून ही गोष्ट मला योग्य वाटली नाही. म्हणून मला मिळालेल्या रकमेच्या मोबदल्यात मी यंदाचा रणजी हंगाम विदर्भाकडून एकही पैसा न स्विकारता खेळण्याचं सुचवलं, ज्याला असोसिएशननेही मान्यता दिली.”

भारताचा कसोटीपटू गौतम गंभीरनेही वासिम जाफरची मुलाखत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाला भरघोस रकमेची बक्षिस मिळाली. यात प्रत्येक खेळाडूला ५ कोटी रुपये देण्यात आले. ( २ कोटी बीसीसीआयकडून मिळणारं बक्षीस आणि ३ कोटी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून मिळणारं बक्षीस ) ३९ वर्षीय वासिम जाफरने विदर्भाची बाजू लावून धरत यंदाच्या हंगामात ६०० धावा केल्या. यावेळी वासिम जाफरने आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल आपण खूश असल्याचंही मान्य केलं. त्यामुळे वासिम जाफरच्या या प्रामाणिकपणाबद्दल सध्या सर्व स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे.