नवव्या रणजी विजेतेपदाचा शिलेदार वसिम जाफरचा निर्धार

पुढील दोन महिन्यांत वयाची चाळिशी गाठणाऱ्या वसिम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बरेच काही साध्य केले आहे. जाफरने यंदा तिसऱ्या हंगामात विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या पहिल्यावहिल्या रणजी विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र ते जाफरच्या कारकीर्दीतील नववे रणजी जेतेपद ठरले. आपली कारकीर्द अस्ताला जात असल्याची खात्री पटलेल्या जाफरने प्रकृती साथ देईल, तोवर खेळत राहण्याचा निर्धार केला आहे.

४१ वेळा रणजी जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईकडून खेळण्याचा अनुभव गाठीशी असणारा जाफर विदर्भच्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला. हंगामाअखेर त्याच्या खात्यावर सहाशेहून अधिक धावा जमा होत्या.

‘‘मी आणखी एका रणजी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत खेळू शकेन, यावर कुणाचाही विश्वास नव्हता. परंतु नवव्यांदा रणजी विजेत्या संघाचा भाग असणे, हे अभिमानास्पद आहे,’’ असे जाफरने सांगितले.

विदर्भाच्या स्वप्नवत यशाबाबत जाफर म्हणाला, ‘‘विदर्भात गुणवत्ता होती. परंतु पंडित यांनी संघाला शिस्त लावली. या खेळाडूंना त्यांच्या मर्यादेची जाणीव नव्हती, परंतु पंडित यांनी त्यांच्यात विश्वास निर्माण केला. संघाला हेच हवे होते.’’ यंदाच्या विसाव्या रणजी हंगामाबाबत जाफर म्हणाला, ‘‘मी फक्त प्रामाणिकपणे क्रिकेटखेळण्याचा विचार करीत असतो. मी मार्गदर्शन आणि समालोचन करू शकतो, याची जाणीव आहे. परंतु क्रिकेट खेळणे हे मला अधिक आनंददायी वाटते. त्यामुळे तंदुरुस्ती साथ देईल, तोपर्यंत खेळत राहीन.’’

वसिम जाफरची कारकीर्द

  • जाफरने १९९६-९७मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. त्यानंतर गेली दोन दशके तो अविरत खेळत आहे. जाफरच्या खात्यावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास १८ हजार धावा जमा आहेत.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच शतकांसह दोन हजारहून अधिक कसोटी धावा त्याच्या नावावर आहेत. २००६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने द्विशतक झळकावले होते.