वसिम जाफर, माजी क्रिकेटपटू

प्रशांत केणी

प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीमधील अनुभवाचा आणि ज्ञानाचा सदुपयोग करण्यासाठी प्रशिक्षकपद सांभाळायला मला अधिक आवडेल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने व्यक्त केले.

‘‘गेली काही वर्षे मी खेळाडू-वजा-मार्गदर्शक म्हणूनच विदर्भ, इंडियन ऑइल या संघांमध्ये भूमिका बजावत होतो. याशिवाय किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बांगलादेश क्रिकेट संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षकपदसुद्धा मी सांभाळले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांचा अनुभव प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीसाठी मला उपयुक्त ठरेल,’’ असे रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असणाऱ्या जाफरने सांगितले. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या जाफरशी आतापर्यंतच्या कारकीर्दीविषयी आणि भावी वाटचालीविषयी केलेली खास बातचीत-

* निवृत्तीनंतर क्रिकेट कारकीर्दीकडे मागे वळून पाहताना तुझ्या काय भावना आहेत?

माझ्या क्रिकेट कारकीर्दीविषयी मी अत्यंत समाधानी आहे. २४-२५ वर्षे क्रिकेट खेळत राहणे सर्वानाच शक्य नसते. त्यामुळे मी स्वत:ला या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीबाबत भाग्यवान समजतो.

* निवृत्तीनंतरच्या दुसऱ्या डावाकडे तू कशा रीतीने पाहतोस?

निवृत्तीनंतरही मैदानाशी ऋणानुबंध जपणे मला महत्त्वाचे वाटते. क्रिकेट प्रशिक्षकपद सांभाळणे किंवा समालोचन करणे, हे दोन प्रमुख पर्याय माझ्यापुढे उभे आहेत. यापैकी प्रशिक्षकपदासाठी मी उत्सुक आहे.

* तू मुंबई आणि विदर्भाच्या रणजी विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहेस. हा अनुभव कसा होता?

मुंबईचा संघ देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढय़ होता. एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा संघात समावेश होता. त्यामुळे मुंबईच जिंकणार हे त्या वेळी जवळपास निश्चित मानले जायचे. यातून बरेच काही शिकायला मिळाले. विदर्भाकडून मात्र माझ्यासह कोणीच रणजी किंवा इराणी विजेतेपदाची अपेक्षा केली नव्हती.  परंतु विदर्भाच्या क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरलेल्या दोन रणजी आणि दोन इराणी विजेत्या संघाचा प्रतिनिधी असल्याचा अभिमान वाटतो. विदर्भ क्रिकेटच्या उत्कर्षांची ही सुरुवात आहे. हेच यश त्यांना कायम टिकवायचे आहे.

* तुझ्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीमधील रणजी क्रिकेटचे तू कसे विश्लेषण करशील?

बदल ही काळाची गरज असते. त्यामुळे काळानुसार क्रि के टसुद्धा बदल गेले आहे. आता चार-पाच दिवसांच्या सामन्यांपेक्षा क्रिकेट चाहत्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेट आवडते. आता क्रिकेट जितके  लघुस्वरूप तितके  अधिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या बदलाकडे मी विकासाच्या पद्धतीने पाहतो.

* कसोटी क्रिकेटचा तू आदर करतोस. सध्या कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या मागणीविषयी तुझे मत काय आहे?

गोल्फमध्ये १८ होल्स असतात, टेनिसमध्ये चार ग्रँडस्लॅम स्पर्धा असतात, फुटबॉलचा सामना ९० मिनिटांचा असतो, हे जसे बदलत नाही तसेच कसोटी सामन्यांच्या ढाच्यात बदल करू नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. कसोटी क्रिकेटची गेले अनेक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांचे प्रयोग झाले. ते चाहत्यांना आवडत असतील तरच कायम ठेवावे. जे काही बदल करायचे असतील ते एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी करावे.