भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि मुंबईकर वासिम जाफर आता बांगलादेशी खेळाडूंना फलंदाजीचे धडे देणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ढाका येथील अकादमीमध्ये जाफर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जाफरशी संपर्क साधला होता. प्राथमिक चर्चेनंतर जाफरने प्रस्ताव स्विकारल्यानंतर याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. झालेल्या करारानुसार जाफर वर्षातील सहा महिने ढाका येथे राहणार आहे.

वासिम जाफरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “मी भविष्यकाळात प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेन असं म्हणालो होतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेला प्रस्ताव मला आवडला आणि म्हणून मी याचा स्विकार करतोय. जूनमध्ये मी ढाका येथे रवाना होईन. बांगलादेश प्रिमीअर लिगसाठी ढाका येथे गेलेला असताना वासिम जाफरला हा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतंय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर वासिम जाफर स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाच्या संघाकडून खेळतो आहे. गेल्या दोन हंगामात आपल्या संघाला रणजी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यात वासिमने महत्वाचा वाटा उचलला आहे. यंदाच्या हंगामातही आपण विदर्भाकडून खेळण्यासाठी तयार असल्याचं वासिमने स्पष्ट केलंय.