04 March 2021

News Flash

जाफरचे सुवर्णमहोत्सवी शतक!

संघाच्या फलंदाजीची फळी ढासळत असताना जिद्दीने उभे राहून कसे सावरायचे, याचा वस्तुपाठच मुंबईचा अनुभवी फलंदाज वसिम जाफरने गुरुवारी दिला. ए

| November 29, 2013 01:42 am

संघाच्या फलंदाजीची फळी ढासळत असताना जिद्दीने उभे राहून कसे सावरायचे, याचा वस्तुपाठच मुंबईचा अनुभवी फलंदाज वसिम जाफरने गुरुवारी दिला. एका बाजूने दिग्गज फलंदाज एकेक करून तंबूची वाट धरत असताना सलामीवीर जाफरने झुंजार फलंदाजी करीत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या सुवर्णमहोत्सवी शतकाची नोंद केली. दुखऱ्या पायाची तमा न बाळगता जाफरने दिवसभर तब्बल ३९३ मिनिटे किल्ला लढवला. त्यामुळेच रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील ‘अ’ गटामधील विदर्भविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८ बाद २५४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. खेळ थांबला तेव्हा जाफर २६१ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह १३३ धावांवर खेळत होता.
वानखेडे स्टेडियमवर काही दिवसांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातील गोलंदाजांचे वर्चस्व या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी प्रकर्षांने दिसून आले.
वेगवान गोलंदाज संदीप सिंगने आपल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईची प्रारंभीच ३ बाद ३९ अशी दैना उडवली. मग जाफरने अभिषेक नायर (२७)सोबत चौथ्या विकेटसाठी ६४ आणि आदित्य तरे(१७) सोबत पाचव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मग डावखुरा फिरकी गोलंदाज रवी जांगिडने मुंबईच्या मधल्या फळीला हादरे दिले. शार्दूल ठाकूरने (२६) सातव्या विकेटसाठी जाफरसोबत ५८ धावांची भागीदारी रचली. ती वगळता मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली.
मुंबईचे अनेक फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. पण ३५ वर्षीय जाफरने मात्र आपली एकाग्रता ढळू न देता संपूर्ण दिवस खेळून काढला.
त्याने आपल्या रणजी कारकिर्दीतील ३४वे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील (पाच कसोटी शतकांसह) ५०वे शतक साकारले. जाफरने शतकाच्या समीप जाताना उमेश यादवच्या १५व्या षटकात जोरदार हल्ला चढवत तीन चौकार ठोकले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या यादवला गोलंदाजीची लयच सापडली नाही. त्याने १९ षटकांत (२ निर्धाव) ६९ धावा दिल्या. त्या तुलनेत ३२ वर्षीय संदीप सिंगच्या गोलंदाजीचे पृथक्करण १९-८-२९-३ असे लक्षवेधी होते.

खंबीरपणे उभे राहून शतक साकारल्याचा जाफरला आनंद
मुंबई : ‘‘शतक साकारले हे अतिशय बरे झाले. कुणीतरी खंबीरपणे उभे राहून धावा काढण्याची आवश्यकता होती. मी ती जबाबदारी पार पाडली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील या ५०व्या शतकाचा मला अतिशय आनंद होतो आहे,’’ अशी प्रतिक्रिया वसिम जाफरने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केली.
तो पुढे म्हणाला, ‘‘पहिले सत्र आव्हानात्मक होते. आमची अवस्था बिकट झाली होती. आमच्याकडून मोठय़ा भागीदाऱ्या झाल्या नाहीत. परंतु मुंबईचा डाव आम्ही सावरला. त्यामुळे दिवसअखेर आमची स्थिती चांगली झाली आहे.’’ ‘‘पहिल्या सत्रात विदर्भाने टिच्चून गोलंदाजी केली. त्या वेळी खेळणे खूप कठीण जात होते. पहिले सत्र खेळून काढले तर पुढे खेळणे कठीण जाणार नाही, याची आम्हाला जाणीव होती,’’ असे जाफरने सांगितले. या वेळी संदीप सिंगच्या गोलंदाजीचे कौतुक करताना जाफर म्हणाला, ‘‘संदीपने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे वेग नसला तरी तो आपल्या क्षमतेने चेंडू चांगला स्विंग करीत होता.’’
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८९ षटकांत ८ बाद २५४ (वसिम जाफर खेळत आहे १३३, अभिषेक नायर २७, शार्दूल ठाकूर २६; संदीप सिंग ३/२९, रवी जांगिड ३/४८)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:42 am

Web Title: wasim jaffer slams 50th first class ton rescues mumbai against vidarbha on ranji day 1
Next Stories
1 मुरलीच ‘क्लासिक’
2 इंग्लंड पुनरागमन करेल -नॅथन लियॉन
3 युनिसेफमध्येही आता सचिन ‘धुलाई’
Just Now!
X