मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सत्तासंग्राम नुकताच आटोपला. निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर काही दिवसातच मुंबई क्रिकेटला धक्का बसला आहे. माजी कर्णधार वासीम जाफरने मुंबईला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असणारा जाफर आता विदर्भकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुब्रमण्यम बद्रीनाथ, गणेश सतीश यांच्यानंतर विदर्भच्या ताफ्यात आणखी एक पाहुणा खेळाडू समाविष्ट होणार आहे. जाफरच्या निर्णयामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जाफर आणि मुंबई संघ ही १९ वर्षांची मॅरेथॉन भागीदारी संपुष्टात येणार आहे. रणजी स्पर्धेत १०,००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रमापासून जाफर अवघ्या ४१ धावा दूर आहे. जाफरचा मुंबई संघातील सहकारी पारस म्हांब्रे विदर्भ संघाचा प्रशिक्षक आहे. म्हांब्रे यांच्या प्रयत्नांमुळेच विदर्भने गेल्या रणजी हंगामात बाद फेरीत धडक मारली होती. जाफरच्या समावेशामुळे विदर्भने डावखुरा फिरकीपटू राकेश ध्रुवला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
जाफर नसल्याने मुंबईच्या फलंदाजीत अनुभवाची उणीव भासणार आहे. मुंबई संघासाठी रनमशीन असलेल्या जाफरने सलामीवीरीच्या भूमिकेबरोबरच नेतृत्त्वाची जबाबदारीही सांभाळली होती.