टोकियो येथे २०२० साली प्रतिष्ठेची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० या दरम्यान रंगणार आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० या स्पर्धेसाठी अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. पण या स्पर्धेत विजेत्यांना दिली जाणारी पदके ही तयार झाली आहेत. महत्वाचे म्हणजे या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली पदके ही मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून तयार करण्यात आली आहेत.

तब्बल ८० हजार मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्यापासून पदके तयार करण्याच्या कार्यासाठी अनेक व्यावसायिकांनी अर्ज केले होते. या साऱ्यांचे मिळून एकूण ४०० अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून पदकाची प्रतिकृती तयार करण्यात आली. जुनिची कावानिशी या कलाकाराने तयार केलेली प्रतिकृती ही अधिक प्रतिकृती यासाठी अंतिम करण्यात आली. त्यानुसार सर्व पदके तयार करण्यात आली. या पदकाचा व्यास ८५ मिलीमीटर इतका असून त्याची जाडी ७.७ मिलीमीटर ते १२.१ मिलीमीटर इतकी आहे. सुवर्णपदकात शुद्ध चांदीवर सुमारे ६ ग्रॅमपेक्षाही अधिकचा सोनेरी मुलामा आहे. रौप्यपदके ही पूर्णपणे चांदीपासून बनवण्यात आली आहेत. तर कांस्यपदके लाल धातूंच्या मिश्रणापासून (red brass alloy) तयार करण्यात आली आहेत. ही पदके ५५६ आणि ४५० ग्रॅम इतक्या वजनाची आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच मोबाईल फोनमधून शिल्लक राहिलेल्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. टोकियो २०२० ही स्पर्धा इको फ्रेंडली असावी, ही त्यामागील संकल्पना आहे.

भव्य स्पर्धेसाठी जी पदके तयार करण्यात आली आहेत, त्यांचे अनावरण टोकियो येथे करण्यात आले. ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक हे जपानमधील नागरिकांसह विविध खेळांचा आनंद लुटताना दिसले. ऑलिम्पिकसाठी राहिलेला वर्षभराचा अवधी लक्षात घेता या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली अनोखी पदके क्रीडाचाहत्यांसाठी खुली करण्यात आली आहेत.