दक्षिण आफ्रिकेतील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत प्रियम गर्गच्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत बांगलादेशने ३ गडी राखत विजय मिळवला, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतलं बांगलादेशचं हे पहिलं विजेतेपद ठरलं. नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत…भारतीय फलंदाजांच्या धावगतीवर अंकुश ठेवला.

यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्माचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज बांगलादेशच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. मधल्या फळीत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनेही फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात मोठा हातभार लावला. मात्र या सामन्यात अथर्व अंकोलेकरसोबत फलंदाजी करत असताना ध्रुव जुरेल विचीत्र पद्धतीने धावबाद झाला.

एक धाव घेण्यासाठी फटका खेळल्यानंतर जुरेल पुढे सरसावला. मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या जवळ पोहचल्यानंतही अथर्व अंकोलेकर धाव घेण्यासाठी तयार नव्हता…मध्येच अथर्वने क्रिसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशी खेळाडूंनी भारतीय फलंदाजाला धावबाद केलं. मात्र यावेळी तिसऱ्या पंचांना कोणत्या भारतीय खेळाडूला बाद ठरवायचं यासाठी बराच विचार करावा लागला.

भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र इतर भारतीय गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे भारताने मोक्याच्या क्षणी सामना गमावला.