भर सामना सुरू असताना प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये मैदानातच तुंबळ हाणामारी झाल्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजीरवाणी घटना बर्म्युडा येथे घडली. क्लेवलँड क्रिकेट क्लब आणि व्हिलो क्रिकेट क्लबमध्ये १२ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थानिक क्रिकेटसामन्यात हा प्रकार घडला. फलंदाज जॉर्ज ओब्रायन फलंदाजी करीत असताना प्रतिस्पर्धी संघाचा यष्टीरक्षक जेसन अँडरसनने ओब्रायनवर कोटी केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. अँडरसन अंगावर धावून आल्याने परिणामी ओब्रायनचाही ताबा सुटला आणि त्याने अँडरसनला बॅटने झोडपले. सामन्याचे पंच आणि मैदानावरील खेळाडू भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्यास न जुमानता दोन्ही खेळाडूंचा एकमेकांना मारण्याचा प्रयत्न सुरूच होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचे बर्म्युडातील जनतेने आपल्या टेलिव्हिजनवर लाइव्ह पाहिला. बर्म्युडा क्रिकेट असोसिएशनने दखल घेऊन अँडरसनवर आजीवन, तर ओब्रायनवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 7:34 pm