चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक (६६) आणि अर्पित वास्वडाच्या शतकामुळे (१०६) यजमान सौराष्ट्राची रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालविरुद्ध मजबूत स्थिती आहे. ५ बाद २०६ या स्थितीतून पुजारा आणि वास्वडा जोडीने सौराष्ट्राला सावरत दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३८४ धावांवर पोहचवले. या सामन्यात अतिशय विचित्र असा एक प्रसंग घडला.

सामन्याच्या ९८ व्या षटकात हा प्रकार घडला. चेतेश्वर पुजारा अतिशय शांत आणि संयमी खेळ खेळत होता. शाहबाझ अहमदच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा पुढे आला आणि त्याने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला आणि प्रतिस्पर्धी संघाने अपील केले.

मैदानावरील पंचांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला नाबाद ठरवले. पण गोलंदाजाला तो निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे त्याने DRS ची मदत घेतली. DRS मध्ये चेंडू बॅटवर न आदळता पायाला लागला असल्याचे स्पष्ट दिसले. चेंडू स्टंपच्या रांगेतदेखील असल्याचे स्पष्ट दिसले. पण देशांतर्गत स्पर्धेतील एका नियमामुळे पुजारा नाबाद राहिला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाज स्टंपच्या क्रीजपासून ९ मीटर अंतर पुढे असेल तर त्याला पायचीत बाद ठरवता येत नाही, असा देशांतर्गत स्पर्धांसाठीचा BCCI चा नियम आहे. त्यामुळे पुजारा नाबाद राहिला. त्यानंतर काही काळ पंच आणि बंगालचे खेळाडू यांच्यात शाब्दिक राडा रंगल्याचे दिसून आले.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी पुजारा तापामुळे निवृत्त झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आल्यावर त्याने २३७ चेंडूंना सामोरे जात डाव सावरला. वास्वडानेही शतकी खेळी करत पुजारासोबत १४२ धावांची भागीदारी केली. वास्वडाने उपांत्य फेरीत गुजरातविरुद्धही विजय मिळवून देणारी खेळी केली होती. त्याचे हे प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले.