पोर्ट एलिजाबेथच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत बरोबरी साधली. १२ धावांनी आफ्रिकेने या सामन्यात बाजी मारली. फाफ डु-प्लेसिस आणि डेव्हिड मिलर यांनी या सामन्यात सीमारेषेवर एक भन्नाट झेल पकडत आपली चपळाई दाखवून दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. कर्णधार क्विंटन डी-कॉकने या सामन्यात ४७ चेंडूत ७० धावा तडकावल्या.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियानेही आश्वासक सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावत कांगारुंचं आव्हान कायम राखलं होतं. एका क्षणाला ऑस्ट्रेलियाला २४ चेंडूत विजयासाठी ३२ धावांची गरज होती, त्यांच्याकडे ७ विकेटही शिल्लक होत्या. मात्र अखेरच्या षटकांत कांगारुंवर दबाव वाढला आणि मिचेल मार्श हा या दबावाचा पहिला बळी ठरला. एन्गिडीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळल्यानंतर चेंडू सीमारेषेपार जाणार होता. मात्र मिलर आणि डु-प्लेसिस यांनी सीमारेषेवर सर्वोत्तम ताळमेळ दाखवत सुरेख झेल टिपला. पाहा हा व्हिडीओ…

यानंतर कगिसो रबाडाने १९ व्या षटकात केवळ ३ धावा देत कांगारुंवर आणखी दडपण वाढवलं. अंतिम षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र नॉर्ट्जेने टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाचे विजयाचे मनसुबे उधळून लावले.