पाकिस्तानमध्ये सत्ताबदलाचे वारे वहायला लागलेले आहेत, माजी क्रिकेटपटू आणि तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान पाकचे नवीन पंतप्रधान होण्याच्या वाटेवर आहेत. मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने १०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलेला आहे. मात्र पाकिस्तानात सत्ता स्थापन करण्यासाठी २७२ पैकी १३७ खासदारांची आवश्यकता असते. सध्याच्या घडीला काही पक्षांच्या मदतीने इम्रान खान पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन करेल असं चित्र निर्माण झालेलं आहे.

अवश्य वाचा – मतदानासाठी अक्रम लंडनहून पाकिस्तानात

पाकिस्तानच्या राजकारणात इतिहास नोंदवण्याआधी, इम्रान खानने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून दिला होता. १९९२ साली इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत इंग्लंडवर मात केली होती.

या अंतिम सामन्यात इम्रान खानने फलंदाजी व गोलंदाजीतही आपली छाप पाडली होती. फलंदाजीदरम्यान पाकिस्तानचे पहिले दोन फलंदाज अवघ्या २४ धावांमध्ये माघारी परतले होते. यानंतर इम्रान खानने जावेद मियादादसोबत १३९ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या संघाच्या विजयाची पायाभरणी केली. मियादाद माघारी परतल्यानंतर इम्रानने इंझमाम उल हकच्या साथीनेही भागीदारी रचली.

पाकिस्तानने दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवातही अडखळती झाली. इयान बोथम हे भोपळाही न फोडता माघारी परतले. यानंतर मधल्या षटकांमध्ये नील फेअरब्रदर आणि अॅलन लॅम्ब यांनी इंग्लंडच्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांच्या संघाचा डाव घसरतच गेला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या. यावेळी इम्रान खानने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. रिचर्ड इलिंगवर्थला बाद करत इम्रानने पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विश्वचषक विजयानंतर इम्रान खानने वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली होती.