दक्षिण आफ्रिकेतील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलेलं आहे. अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावर ३ गडी राखत मात करत पहिल्यांदाच १९ वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. भारताने विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं आव्हान बांगलादेशने संयमी खेळी करत पूर्ण केलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र इतर भारतीय गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे भारताने मोक्याच्या क्षणी सामना गमावला.

मात्र या विजयाचं सेलिब्रेशन करताना बांगलादेशी खेळाडूंनी अनावश्यक वाद ओढवून घेत विजयाला गालबोट लावलं. सामन्यात बाजी मारल्यानंतर बांगलादेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोषाला सुरुवात केली. यादरम्यान बांगलादेशच्या संघातील एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं…यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे काहीकाळ मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. मात्र पंचांनी वेळेतच यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बांगलादेशच्या संघाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परवेझ हुसैन इमॉन आणि तांझिद हसन या जोडीने बांगलादेशला चांगली सुरुवात करुन दिली. विजयासाठी छोटं लक्ष्य असल्यामुळे बांगलादेश हा सामना सहज जिंकणार असं वाटत असतानाच रवी बिश्नोईने तांझिदला माघारी धाडलं. यानंतर उपांत्य सामन्यात शतकवीर महमदुल हसनचाही रवीने त्रिफळा उडवला. यानंतर बांगलादेशच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. बिश्नोई आणि सुशांत मिश्राने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारताची बाजू वरचढ केली. त्यातच परवेझ इमॉनला धावताना त्रास जावणायला लागल्यामुळे त्याने मैदान सोडणं पसंत केलं.

परवेझ माघारी परतल्यानंतर कर्णधार अकबर अलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशला सहावा धक्का बसल्यानंतर परवेझ आपली दुखापत विसरुन मैदानात उतरला. परवेझ आणि अकबर अली जोडीने संयमी फलंदाजी करत बांगलादेशला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. प्रियम गर्गने ही जोडी फोडण्यासाठी अखेरीस यशस्वी जैस्वालला चेंडू दिला, यशस्वीनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत इमॉनला माघारी धाडलं, त्याने ४७ धावांची खेळी केली. मध्यंतरी सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ काही मिनीटांसाठी थांबवण्यात आला. यादरम्यान डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी १७० धावांचं आव्हान देण्यात आलं. पावसाचा व्यत्यय थांबल्यानंतर कर्णधार अकबल अलीने रकीब उल-हसनच्या साथीने संयमीपणे खेळ करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.