देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्व क्रिकेटपटूही आपल्या घरात राहत परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

टीम इंडियाना नवोदीत गोलंदाज नवदीप सैनीही सध्या आपल्या घरातच आहे. लॉकडाऊनच्या काळात जमेल तसं तो गोलंदाजीचा सराव आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नवदीपने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मध्यंतरी नवदीपने आयपीएलवरही आपलं मत व्यक्त केलं होतं. सध्याच्या खडतर काळात माणसांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं सैनी म्हणाला होता. माणसं वाचली तरच क्रिकेट खेळता येईल असं नवदीपने स्पष्ट केलं होतं. दरम्यान, सध्याच्या घडीला देशभरात महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत…त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सरकारी यंत्रणांना कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.