सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत फलंदाजांकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळते. सोमवारी झालेल्या संघातदेखील अशीच दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. इंग्लंडच्या टॉम बॅन्टनने तुफानी खेळी करत ५ चेंडूत ५ षटकारांची बरसात केली. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या IPL लिलावात या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्स संघाने विकत घेतले आहे, त्यामुळे ब्रन्टनच्या फटकेबाजीची विशेष चर्चा सुरू आहे.

टॉम बॅन्टनने सोमवारच्या सामन्यात तुफानी खेळी करत क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. ब्रिस्बेन हिट या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॅन्टनने सिडनी थंडर्स संघाच्या गोलंदाजांचा मारा चांगलाच चोपून काढला. पावसामुळे हा सामना नियोजित वेळेवर सुरू होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार हा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला आणि त्यात ब्रिस्बेन हिट संघाने १६ धावांनी विजय मिळवला. सामन्यातील एका षटकात बॅन्टनने वेगवान गोलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर पुढील पाच चेंडूत पाच षटकार ठोकले.

पाहा व्हिडीओ –

प्रथम फलंदाजीला आलेल्या ब्रिस्बेन हिट संघाकडून बॅन्टन आणि ख्रिस लीन यांनी पहिल्या विकेटसाठी पाच षटकांत ९० धावांची तुफानी भागीदारी केली. लीनने १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचत ३१ धावा केल्या आणि तो माघारी परतला. त्यानंतर बॅन्टनने दमदार खेळी करत ५६ धावा केल्या. त्यामुळे ब्रिस्बेन हिटने ८ षटकात ४ बाद ११९ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सला ५ षटकांत ४ बाद ६० धावाच करता आल्या. पुन्हा पाऊस आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार ब्रिस्बेन हिट संघाला १६ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.