ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. चांगली सुरुवात केल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी दयनीय झाली. अखेरीस जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जसप्रीत बुमराहने यादरम्यान प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतकही झळकावलं.

बुमराहने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. फिरकीपटू स्वेप्सनने मोहम्मद सिराजला माघारी धाडत भारताचा डाव संपवला. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये परत येत असताना टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी जसप्रीत बुमराहला त्याच्या खेळीसाठी गार्ड ऑफ ऑनर देत त्याचं कौतुक केलं.

मोहम्मद सिराजनेही २२ धावांची खेळी करत बुमराहला चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त भारताकडून पृथ्वी शॉने ४०, शुबमन गिलने ४३ धावांची खेळी केली. गोलंदाजीतही बुमराहने भारताला चांगली सुरुवात करुन देत ऑस्ट्रेलियाच्या जो बर्न्सला झटपट माघारी धाडलं.