अ‍ॅडलेडचा मानहानीकारक पराभव ते मेलर्बनवरील ऐतिहासिक विजय हे जय-पराजयाचे दोन टोकाचे क्षण भारतीय क्रिकेट संघाने १० दिवसांत अनुभवले. गुरुवारपासून सिडनीत तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या कसोटीतील विजयासह नव्या वर्षांचा यशस्वी प्रारंभ करण्याचा निर्धार कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कंपनीनं केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीतावेळी मोहम्मद सिराज भावूक झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यातून आश्रू कोसळले.

सिराजचा हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिराज भावनिक झाला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराहनं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपल्या अधिकृत ट्विटरवर हा भावनिक क्षण पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- याला म्हणतात दरारा… भारतीय गोलंदाजांमुळे ३५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागला ‘तो’ निर्णय

मेलबर्न येथील कसोटीत सिराजनं पदार्पण केलं होतं. पदार्पणातच सिराजनं आपल्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. वासिम जाफरनेही ट्विट करत सिराजला दाद दिली आहे. आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी थोडी किंवा गर्दी नसली तरी चालेल पण भारताकडून खेळण्यापेक्षा मोठी कोणतीही प्रेरणा नाही. एकदा मोठ्या दिग्गजानं म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही गर्दीसाठी नाही, देशासाठी खेळत आहात.” असं ट्विट जाफरनं केलं आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यातही गोलंदाजी करताना सिरजानं भारतीय संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली. सिराजनं अनुभवी डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात बाद केलं. सिरजाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात वॉर्नर पुजाराकडे झेल देऊन माघारी परतला. पावासामुळे खेळ थांबवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं ७.१ षटकांत २१ धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. सिराजचा भावनिक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही भावनिक होत सिराजला दाद दिली आहे.

आणखी वाचा- IND vs AUS: भारताचा नवदीप सैनी पडला ऑस्ट्रेलियाच्या पुकोव्हस्कीवर भारी, कारण…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मोहम्मद सिराजच्या वडिलांचं भारतात अल्पशा आजाराने निधन झालं. भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आधारवड हरपल्यामुळे सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतू यातून सावरत त्याने भारतीय संघासोबत राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मिळालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आश्वासक मारा करत स्वतःची निवड सार्थ ठरवली.

आणखी वाचा : रिक्षावाल्याचा मुलगा भारतीय संघात; वाचा सिराजची संघर्षपूर्ण कहाणी