भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी कमालीचा खेळ दाखवला. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोराववर भारताने पाहुण्या न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आपल्या डावाला धमाकेदार सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीर कॉलिन मुन्रोने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात तीन षटकार खेचत आपण समर्थ असल्याचे संकेत दिले. एका बाजूने त्याची फटकेबाजी सुरु असताना मार्टिन गप्तील अवघ्या १० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मुन्रो आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. २५ व्या षटकात ही जोडी फोडून चेहलने भारताला दुसऱे यश मिळवून दिले. त्याने कॉलिन मुन्रोला ७५ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार विल्यमसन ६४ धावांवर चहलचाच शिकार झाला.

न्यूझीलंडची ही जोडी तंबूत परतल्यानंतर सामना भारताच्या बाजूने झुकतोय, असे वाटत असताना लॅथमने मैदानात तग धरत सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, कॉलिन डी ग्रँडहोमी आणि त्यांच्यातील ताळमेळ न जुळल्याने लॅथमला अटीतटीच्या क्षणी धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. बुमराहच्या पाचव्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याच्या नादात तो बाद झाला.

बुमराहचा पाचवा चेंडू कॉलिन डी ग्रँडहोमीला समजला नाही. तो सरळ धोनीच्या हातात स्थिरावला. प्रत्येक धाव महत्त्वाची असल्याचे डोक्यात असल्यामुळे लॅथम धोनीची चपळता विसरला. न्यूझीलंडच्या जोडीचा ताळमेळ बिघडल्यानंतर धोनीने बुमराहसोबत ताळमेळ दाखवत लॅथमला बाद केले. लॅथम बाद होताच अखेरच्या दोन षटकात भारताने सामना आपल्या बाजून वळवला. न्यूझीलंडला या सामन्यात ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.