क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला विकेट घेण्याच्या अनेक संधी समोर येतात. काहीवेळा या संधीचं सोनं होतं तर काहीवेळा क्षुल्लक कारणामुळे ही संधी निघून जाते. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळात असाच काहीसा प्रकार घडला आहे. हातावर बसलेल्या माशीमुळे दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने केशव महाराजच्या गोलंदाजीवर आलेली यष्टीरक्षणाची सोपी संधी वाया घालवली.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३१ व्या षटकात शॉन मार्श हा फलंदाज १५ धावांवर खेळत होता. यावेळी केशव महाराजच्या गोलंदाजीवर शॉन मार्श मोठा फटका खेळण्यासाठी पुढे सरसावला. यावेळी क्विंटन डी कॉककडे मार्शला यष्टीचीत करण्याची संधी आली होती. मात्र याच वेळी एक माशी डी कॉकच्या हातावर येऊन बसली आणि या नादात डी कॉकच्या हातून मार्शला यष्टीचीत करण्याची संधी निघून गेली.

दुर्दैवाने या जीवदानाचा मार्शला फायदा उचलता आला नाही. या घटनेनंतर केवळ एक धाव काढल्यानंतर केशव महाराज यानेच ऑस्ट्रेलियाच्या मार्श बंधूंची जोडी फोडली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही.