फुटबॉलच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडुंमधील बाचाबाची आणि भांडणाचे प्रकार हे नित्याचेच असतात. त्यामुळे एकुणच या आक्रमक आणि धसमुसळ्या खेळाडूंना आवरण्यासाठी मैदानावरील पंचांची भूमिका अतिश्य निर्णयाक असते. वेळ पडल्यास हे पंच कठोरपणे संबंधित खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवतात. मात्र, ब्राझीलमधील फुटबॉलच्या सामन्यात यापेक्षा एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. यावेळी मैदानवरील पंचाचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट खेळाडूवर पिस्तूल रोखून धरले. मात्र, वेळीच काहीजणांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. या सामन्यात अमतेंस दे बोला संघाच्या एका खेळाडूने पंच गॅब्रिएल मुंटा यांना धक्का मारत कानाखाली लगावली. मुंटा हे पेशाने पोलीस असून ते स्थानिक सामन्यांमध्ये पंचाचे काम करतात. खेळाडूच्या कृतीने संतप्त झालेले मुंटा तडक त्यांच्या चेजिंग रूममध्ये गेले आणि स्वत:ची पिस्तूल घेऊन बाहेर आले. त्यानंतर त्यांनी थेट पिस्तूल त्या खेळाडूवर रोखून धरले. मात्र, त्याचवेळी एका लाईन्समनने प्रसंगावधान दाखवत संतप्त अवस्थेतील मुंटा यांना त्याठिकाणाहून दूर नेले. त्यामुळे पुढील अनर्थ प्रसंग टळला. दरम्यान, मुंटा यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.