करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात आपल्या घरामध्ये राहत परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र या काळातही भारतीय खेळाडू आपल्या सहकाऱ्यांशी, चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत क्रिकेटचा माहोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला आपल्या खास शैलीत ट्रोल केलं आहे.

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ही मुंबई इंडियन्सची जोडगोळी सोशल मीडियावर लाईव्ह येत…चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होती. यादरम्यान ऋषभ पंतने रोहित शर्माला सर्वात लांब षटकार कोण मारतं असं आव्हान दिलं. पंतच्या या आव्हानाला रोहितनेही आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलंय…पाहा काय म्हणाला हिटमॅन –

रोहित शर्माचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशात करोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.