क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक खेळाडू आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. मात्र, फार कमी खेळाडूंना यात यश मिळते. या यशासोबत त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावण्यात मदत होते. भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंह धोनी याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने नेतृत्वाची धूरा सांभाळताना दाखवलेले कसब आणि यष्टीमागील चपळता याची नेहमीच चर्चा होते. सध्याच्या घडीला धोनीसारखा यष्टिरक्षक नाही, असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही.

पुरुष क्रिकेट संघात त्याच्यासारखा अंदाज पाहायला मिळत नसला तरी, महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडची सारा टेलर सध्या धोनीच्या अंदाजात यष्टिमागे चपळता दाखवताना दिसत आहे. जसे मिताली राजला महिला क्रिकेटमधील सचिन म्हणून ओळखले जाते, अगदी त्याचप्रमाणे सारा टेलरला महिला क्रिकेटमधील धोनी म्हणायचे का? असा प्रश्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील तिची चपळता पाहून तुम्हाला नक्कीच पडेल.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रविवारी रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सहाराने यष्टीमागे कमालीची कामगिरी केली. इंग्लंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १५२ धावा केल्या होत्या. यात सारा टेलरने ४ चौकारांच्या मदतीनं २३ चेंडुत ३० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिलांनी चांगली सुरुवात केली. मात्र, सहाव्या षटकात बेथ मूनी धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचीची फलंदाजी कोलमडली. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या इलियास विलॅनीचे सारा टेलरने अफलातून स्टंपिंग करत सर्वांचे लक्ष वेधले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच साराने विलॅनीला बाद केले होते. तिच्या या स्टंपिंगची चांगलीच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे. इंग्लंड महिलांनी हा सामना ४० धावांनी जिंकला.