ऑस्ट्रेलियात महिलांच्या तिरंगी टी-२० मालिकेत अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान होतं. मात्र भारतीय महिला संघ १४४ धावांपर्यंत मजल मारु शकला, ११ धावांनी ऑस्ट्रेलियन महिलांनी बाजी मारत तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं.

अवश्य वाचा –  Women’s T20 Series : अंतिम फेरीत भारतीय महिलांच्या पदरी पराभव, ऑस्ट्रेलियाची बाजी

या सामन्यात भारतीय महिला संघासोबत एक दुर्दैवी प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर मेग लेनिंग आणि बेथ मुनी या फलंदाज मैदानावर होत्या. अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर लेनिंगने एकेरी धावेसाठी एक फटका खेळला. सुदैवाने हा चेंडू शिखा पांडेच्या हातात गेला, यावेळी शिखाकडे लेनिंगला धावबाद करण्याची चांगली संधी होती. मात्र शिखाने फेकलेला थ्रो हा स्टम्प माईकच्या वायरला लागला आणि लेनिंगला जीवदान मिळालं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅलेसा हेलीला दिप्ती शर्माने झटपट माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर अ‍ॅश्ले गार्डनर आणि बेथ मुनी यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. अरुंधती रेड्डीने गार्डनरला माघारी धाडत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांना फारशी आश्वासक कामगिरी करता आली नाही. मात्र बेथ मुनीने एक बाजू लावून धरत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. तिने ५४ चेंडूत बेथने ९ चौकारांसह ७१ धावा केल्या. मुनीच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १५५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी २-२, तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डीने १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतली. यानंतर स्मृती मंधाना आणि रिचा घोष यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. मात्र ऑस्ट्रेलियन डावाप्रमाणे भारतीय डावालाही गळती लागली. रिचा घोष माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मंधानाने एक बाजू लावून धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना स्मृतीने ३७ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनान्सनने भारताचा निम्मा संघ गारद केला, तिला टायला व्लॅमेनिकने २ तर एलिस पेरी-मेगन स्कट आणि अ‍ॅनाबेल सदरलँडने प्रत्येकी १-१ बळी घेतला.