गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नरेन याने क्रिकेट विश्वान अनोख्या विक्रमाची नोंद केली. कोलकाताने यावेळी सुनील नरेन याला सलामी फलंदाजीला पाठवले होते. संघाचा विश्वास सार्थ ठरवत नरेनने अगदी पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजीला सुरूवात केली. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात नरेनने केवळ १७ चेंडूत ४२ धावांची खेळी साकारली. पण यावेळी नरेनने सर्व धावा केवळ चौकार आणि षटकाराने केल्या. नरेनने एकही धाव काढली नाही. नरेनने आपल्या खेळीत तब्बल ९ चौकार आणि १ खणखणीत षटकार ठोकला. अशाप्रकारे त्याने ४२ धावांची साकारली. आयपीएलमध्ये याआधी मुंबई इंडियन्सकडून सनथ जयसुर्या याने एकही धाव न घेता केवळ चौकारांनी ३६ धावा केल्या होत्या. जयसुर्याचा हा विक्रम मोडीत काढून नरेनने नवा विक्रम प्रस्थापित केला.

नरेनने प्रवीण कुमारच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकले. तेव्हाच नरेनने आपले इरादे स्पष्ट केले होते. पुढच्या षटकात जेम्स फॉकनरचा त्याने चांगलाच समाचार घेतला. फॉकनरच्या पहिल्याच चेंडूवर नरेनने एक्स्ट्रा कव्हर्सवर चौकार ठोकला. तर दुसरा चेंडू डॉट बॉल ठरला. नंतर त्यापुढील तीन चेंडूवर नरेनने लागोपाठ तीन चौकार लगावले. मग रैनाने गोलंदाजीत बदल करून प्रवीण कुमारऐवजी बसिल थम्पी याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. थम्पीचा पहिला चेंडू नरेनने खेळून काढला. त्यानंतर या षटकात नरेनने दोन चौकार आणि एक षटकार देखील ठोकला. अशाप्रकारे नरेनने अवघ्या १६ चेंडूत ४२ धावा ठोकल्या होत्या. पुढील षटक खुद्द कर्णधार रैनाने टाकले आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात नरेन झेलबाद झाला.

सुनील नरेनच्या स्फोटक खेळीचा व्हिडिओ-