वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी आजचा म्हणजेच ३ एप्रिलचा दिवस खूप खास आहे. चार वर्षांपूर्वी २०१६ साली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने पुरूष आणि महिला अशा दोनही टी २० विश्वचषकांवर एकाच दिवशी आपले नाव कोरले होते. या मजेदार बाब म्हणजे या दोनही अंतिम सामन्याची जागा ही कोलकातामधील इडन गार्डन्स ही होती. ३ एप्रिलला आधी महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. तर त्यानंतर कार्लोस ब्रेथवेटच्या फलंदाजीच्या जोरावर पुरूष संघाने विश्वचषक जिंकला.

सलग ४ चेंडूत ४ षटकार खेचत जिंकला होता विश्वचषक

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर वेस्ट इंडीजसमोर १५६ धावांचे आव्हान इंग्लंडकडून ठेवण्यात आले होते. आठव्या क्रमांकावर कार्लोस ब्रेथवेट खेळायला आला. वेस्ट इंडीजला १२ चेंडूत २७ धावा हव्या होत्या, त्यावेळी मार्लोन सॅम्युअल्सने चौकार खेचत षटकाची सुरूवात केली होती. पण त्यानंतर ख्रिस जॉर्डनने भेदक मारा करत पुढील ५ चेंडूत केवळ ४ धावा दिल्या. त्यामुळे वेस्ट इंडीजपुढे ६ चेंडूत १९ धावांचे आव्हान होते आणि फलंदाजी करत होता नवोदित खेळाडू ब्रेथवेट… पण बेन स्टोक्सच्या गोलंदाजीचा ब्रेथवेटने निव्वळ चुराडा केला. षटकाच्या पहिल्या ४ चेंडूंवर ४ उत्तुंग षटकार लगावत त्याने सामना जिंकला आणि वेस्ट इंडीजला टी २० पुरूष क्रिकेट इतिहासातील दुसरा विश्वचषक मिळवून दिला.

वेस्ट इंडीजने ५ वर्षात जिंकले २ विश्वचषक

इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडीजने १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मार्लोन सॅम्युअल्स याने नाबाद ८५ धावांची खेळी केली होती, त्यामुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता. त्या आधी २०१२ साली वेस्ट इंडीडने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी देखील सॅम्युअल्सलाच सामनावीराचा किताब प्रदान करण्यात आला होता. त्या सामन्यात त्याने ७८ धावा केल्या होत्या.