रणजी विजेत्या गुजरातच्या संघाकडून खेळणारा गोलंदाज रुद्र प्रताप सिंग एका नकारात्मक कारणामुळे चर्चेत आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे गुजरातच्या विजयात योगदान देणारा रुद्र प्रताप सिंगची असभ्य वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे रुद्र प्रताप सिंग वादात सापडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि गुजरातमध्ये रणजी सामना रंगात असताना रुद्र प्रताप सिंह सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी सीमारेषेजवळच रुद्र प्रताप सिंगचे काही चाहते उपस्थित होते. या चाहत्यांनी रुद्र प्रताप सिंहकडे सेल्फीची मागणी केली. मात्र या चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याऐवजी किंवा त्यांना नम्रपणे नकार देण्याऐवजी रुद्र प्रताप सिंहने एका चाहत्याचा मोबाईल काढून घेतला आणि सीमारेषेजवळ टाकून दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याआधी रुद्र प्रताप सिंहने सामना पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांना मधले बोट दाखवले होते. मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यातच हा प्रकार घडला होता. रुद्र प्रताप सिंह भारताकडून १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघात रुद्र प्रताप सिंहचा समावेश होता. यंदाच्या रणजी मोसमात रुद्र प्रताप सिंहने गुजरातसाठी दमदार कामगिरी बजावली आहे. मुंबई विरुद्धच्या अंतिम फेरीत रुद्र प्रताप सिंहने चार फलंदाजांना बाद केले.