महेंद्रसिंह धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. क्रिकेटमधील त्याचे डावपेच प्रतिस्पर्ध्याला कळत नाहीत. त्याची रणनिती आणि क्षेत्ररक्षणातील बदल सामन्यात चमत्कार घडवून आणतात. अशीच एक घटना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात घडली. आक्रमक खेळणाऱ्या राजस्थानच्या जोस बटलरला फिरकीपटू रवींद्र जडेजाने धोनीच्या सल्ल्याने कसे बाद केले, हे समोर आले आहे.

राजस्थान रॉयल्सने मुंबईच्या वानखेडे मैदानावर नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या शेवटी ड्वेन ब्राव्होच्या फटकेबाजीमुळे चेन्नईला 20 षटकात 188 धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ जोस बटलरच्या खेळीमुळे आव्हानाचा त्वेषाने पाठलाग करत होता. बटलर चेन्नईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करत होता. त्याने 10व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. हा नो बॉल होता. यानंतर चेंडू बदलवावा लागला. नव्या चेंडूबद्दल धोनीने जडेजाला एक सल्ला दिला.

 

धोनी जडेजाला म्हणाला, ”चेंडू कोरडा आहे, वळेल.” यानंतर जडेजाने बटलरला चेंडू टाकला. तो बटलरला कळायच्या आत त्याची यष्टी घेऊन गेला आणि इथेच सामना फिरला. बटलरनंतर राजस्थानचा डाव गडगडला. त्यांना 20 षटकात 143 धावांपर्यंतच मजल मारता आली.

असा रंगला सामना…

वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या बाराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी दमदार गोलंदाजी करत राजस्थानचे कंबरडे मोडले. अलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. राजस्थानचा हा लीगमधील दुसरा पराभव ठरला. विशेष म्हणजे, चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता.