भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटीच्या पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व राखलं आहे. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या १५० धावांत गारद झाला. मुश्फिकूर रहिम आणि मोमिनुल हक यांचा अपवाग वगळता एकही बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. मोहम्मद शमीने सामन्यात ३ तर इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन आश्विनने प्रत्येकी २-२ बळी घेतले. बांगलादेशचा एक फलंदाज धावबाद झाला.

विशेषकरुन मोहम्मद शमीने या सामन्यात आक्रमक मारा केला. पहिल्या सत्राच्या अखेरीस मोहम्मद शमीने बांगलादेशी गोलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. विराट कोहलीने बांगलादेशची जमलेली जोडी फोडण्यासाठी शमीच्या हाती चेंडू सोपवला. बांगलादेशी फलंदाजांचा रागरंग पाहून विराटने शमीला चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा सल्ला दिला आणि काही क्षणातच शमीने बांगलादेशी गोलंदाजांची दाणादाण उडवली.

दरम्यान पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची सुरुवातही खराब झाली. रोहित शर्मा अबु जायदेच्या गोलंदाजीवर लिटन दासकडे झेल देऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – ऋषभला कामगिरीत सुधारणा करण्याची गरज, माजी भारतीय यष्टीरक्षकाने दिला सल्ला