विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला सध्या साउदम्पटन शहरात सराव करते आहे. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव केला आहे. बीसीसीआयने कोहलीच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये फारसा गोलंदाजी करताना दिसत नाही. मात्र त्याच्या नावावर वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी ४-४ बळी जमा आहेत. २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यात विराट कोहलीने शेवटची गोलंदाजी केली होती. २०१६ साली टी-२० विश्वचषकात विंडीजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने गोलंदाजी केली होती. आज नेट्समध्ये सरावादरम्यान कोहलीने ऑफकटर चेंडू टाकले.

त्याआधी टीम इंडियाने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून क्षेत्ररक्षणाचाही सराव केला.

स्पर्धा सुरु होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांपैकी एका सामन्यात भारताला विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.