कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळण्यास सक्षम असल्याचे विराट कोहलीने गेल्या काही मालिकेतील कामगिरीने सिद्ध केले आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली. यावेळी फलंदाजीतील सातत्य राखून भारतीय संघाला विजयपथावर नेण्याचे आव्हान कोहलीसमोर होते. हे आव्हान त्याने लीलया पेलले आहे. स्वत:च्या खेळीतील सातत्य राखत विराट कोहली दिमाखात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतोय.

नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि एकमेव टी-२० सामन्यात विराट ब्रिगेडने इतिहास रचला. कसोटीत ३-० असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिका देखील ५-० अशी खिशात घातली. एवढेच नाही तर श्रीलंकेविरुद्धच्या अखेचा टी-२० सामना जिंकून विराट ब्रिगेटने श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केलं. श्रीलंका दौऱ्यावरील एकदिवसीय सामन्यात दोन शतके आणि टी-२० सामन्यातील ८२ धावांची विराटची दमदार खेळी अविस्मरणीय अशीच होती. पण तुम्हाला माहिती आहे का? कोहलीच्या डाव्या हातामध्ये तितकीच ताकद आहे. श्रीलंका दौऱ्यादरम्यान विराट कोहली डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

तो ज्या अंदाजात उजव्या हाताने फटकेबाजी करण्यात पारंगत आहे. अगदी त्याचप्रमाणे तो डाव्या हाताने देखील उत्तुंग फटकेबाजी करु शकतो, असेच या व्हिडिओतून दिसते. सौरभ मल्होत्रा या नेटिझनने ट्विटर अकाउंटवरुन डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या विराटचा व्हिडिओ शेअर केला आहे. डाव्या हाताने देखील उत्तुंग फटकेबाजी करण्यात विराटचा हातखंडा आहे, अशा आशयाचा उल्लेख व्हिडिओ शेअर करताना केला आहे. शिवाय डाव्या हाताने केलेली फटकेबाजी वाईट नाही, असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. उजव्या हाताने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या विराटचा डावखुरा अंदाज त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे.