२०१९ हे वर्ष भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी अतिशय चांगलं गेलं. वन-डे, कसोटी आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहितने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या या खेळाचं माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी कौतुक केलं आहे.

“ज्यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत असतो त्यावेळी मी टीव्हीसमोरुन उठत नाही. त्याची फलंदाजी पाहणं मला आवडत, ही एका प्रकारची पर्वणीच असते. ज्या क्षणी गरज असते त्यावेळी तो फटकेबाजी करतो. त्याची फटक्यांची निवडही चांगली आहे. टप्पा पडल्यावर बॉलचा अंदाज त्याला अचूक कळतो”, एका मुलाखतीत अब्बास यांनी रोहितच्या खेळाची प्रशंसा केली.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत रोहित शर्माने पुनरागमन केलं आहे. यंदा भारतीय संघासमोर टी-२० विश्वचषकाचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या वर्षात रोहित शर्माची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.